पाली : गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना त्रास होऊ नये, यासाठी महामार्ग वाहतूक पोलिस व जिल्हा पोलीस दल जिल्ह्यातील महामार्गावर चोविस तास तैनात आहेत. त्यामूळे वाहतुक कोंडी कमी करण्यात यश आले आहे. महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे व पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ती सोडविताना पोलिसांची कसोटी लागत आहे पण वाहतूक सुरळीत होत आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे
महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असल्यामुळे कोंडी होत आहे. दोन दिवस वाहतूक पोलिस महामार्गावर चोविस तास सतर्क आहेत. याबाबत रत्नागिरी विभागाच्या महामार्ग वाहतूक पोलिस निरीक्षक दिपाली जाधव म्हणाल्या, रत्नागिरी विभागातील मुंबई-गोवा महामार्गाची चिपळूण ते कसाल (जि. सिंधुदुर्ग) अंतरातील हद्द रत्नागिरी विभागाअंतर्गत येते. त्यामध्ये तीन महामार्ग वाहतूक पोलिस मदत केंद्राच्या माध्यमातून,पेंडॉल बंदोबस्त व सुरक्षा गस्त करण्यात येत आहे. याकरिता महामार्ग वाहतुक पोलिस मदत केंद्र कशेडी ३४, चिपळूण ५१, हातखंबा ४७ असे १३२ नियमित आणि परजिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली आहे.
महामार्गावर चाकरमान्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्यामुळे व महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामामुळे व काही ठिकाणी सेवा रस्त्यांवर असलेले मोठे खड्डे यामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पोलिसांची नजर चुकवून महामार्गावर बंदी असतानाही अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने त्यावर कारवाई करून थांबविले आहेत. शिवाय महामार्गावर असणाऱ्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या वाहनांची होणारी गर्दी कमी करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात येत आहे.