राजू सागवेकर/ राजापूर : न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथील विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासाची गैरसोय लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) राजापूर ते जैतापूर या मार्गावर खास शालेय बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेमुळे अनेक विद्यार्थ्यांचा रोजचा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होणार आहे.
राजापूर आगार व्यवस्थापक श्री. अजितकुमार गोसराडे यांच्या पुढाकाराने व मुंबई सेंट्रल येथील महाव्यवस्थापक मा. हसबनीस साहेब यांच्या आदेशानुसार ही बस सेवा मंजूर करण्यात आली आहे. जैतापूरचे सरपंच, न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि जैतापूर एज्युकेशन सोसायटी यांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला.
ही शालेय बस सेवा दुपारी ३.३० वाजता राजापूरहून जैतापूर आणि सायंकाळी ५.०० वाजता जैतापूरहून राजापूर व्हाया सोनार, गडगा, कुवेशी, तुळसुंदे मार्गे नियमित सुरु करण्यात आली आहे.
या निर्णयाबद्दल जैतापूर ग्रामपंचायत, शाळा प्रशासन आणि जैतापूर एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने एसटी महामंडळाचे विशेष आभार मानण्यात आले. आभार पत्र सुपूर्द करताना सोसायटीचे विश्वस्त श्री. दिवाकर आडविरकर, विजय गोरिवले आणि भाई महाडिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या या सकारात्मक निर्णयाबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरसाठी एसटीची शालेय बस सेवा सुरू; एसटी महामंडळाचे पालकांनी मानले आभार
