GRAMIN SEARCH BANNER

सिंधुदुर्गच्या साकेडी गावात दुर्मिळ ‘दुग्धपाण सतीशिळे’चा शोध; मध्ययुगीन सतीप्रथेवर नव्याने प्रकाश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील साकेडी गावामध्ये, लिंगेश्वर-गांगोबा मंदिर परिसरात २५ मे २०२५ रोजी करण्यात आलेल्या संशोधनादरम्यान इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा १५ सतीशिळांचा समूह आढळून आला आहे. विरगळ व सतीशिळा अभ्यासक स्नेहल बने यांनी केलेल्या या सखोल अभ्यासामध्ये अनेक प्रकारच्या सतीशिळा समोर आल्या असल्या, तरी त्यात विशेषत्वाने लहान मुलाला दुग्धपान (स्तनपान) करतानाचे शिल्प असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण सतीशिळा त्यांच्या निदर्शनास आली आहे. ही दुर्मिळ सतीशिळा मध्ययुगीन सतीप्रथेच्या विविध पैलूंवर नव्याने प्रकाश टाकणारी ठरणार आहे.

सतीप्रथेचे विविध पैलू आणि दुग्धपाण सतीशिळेचे महत्त्व:

स्नेहल बने यांनी या वैशिष्ट्यपूर्ण सतीशिळेबद्दल सविस्तर माहिती दिली. सतीची चाल ही मध्ययुगीन भारताची एक प्रमुख सामाजिक विशेषता होती. पतीच्या निधनानंतर पत्नीने स्वतःला अग्नी समर्पित करण्याची ही एक जुनी परंपरा होती. जरी प्राचीन धर्मग्रंथांमध्ये या प्रथेचे फारसे स्पष्ट वर्णन नसले, तरी समाजमान्य रूढी म्हणून ती सर्व प्रांतांमध्ये प्रचलित होती.

सती जाण्यामागे अनेक कारणे होती. काही स्त्रिया पतीवरील असीम प्रेमापोटी स्वेच्छेने अनुमरण पत्करत असत. तर मध्ययुगीन काळात सती जाणे हे प्रतिष्ठेचे आणि उच्च नैतिकतेचे लक्षण मानले जाऊ लागले. पुनर्विवाहास त्याज्य मानले गेल्याने, कुटुंबातील ज्येष्ठांचे आणि समाजाचे दडपणही अनेक स्त्रियांना सती जाण्यास भाग पाडे. पतीपश्चात होणारी कुचेष्टा, अवहेलना, परावलंबित्व आणि सासर-माहेरकडून मिळणारी उदासीनता अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांना नाइलाजाने सती जावे लागत असे.

शास्त्र आणि रूढींचा संघर्ष:

महत्त्वाचे म्हणजे, प्राचीन धर्मग्रंथांमध्ये ज्या स्त्रीला दूध पिणारे बालक आहे किंवा जी स्त्री गर्भवती आहे, अशा स्त्रीने सती जाऊ नये, असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. तसेच, मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीसाठी सती जाण्यापूर्वी शुचिर्भूत होण्याचे काही नियम सांगितले होते, ज्यात १० किलो तांदूळ दळणे किंवा गायी दान करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. सद्‌गुरूचरित्र आणि महानुभव ग्रंथांमध्येही सतीप्रथेबद्दल आणि गर्भवती किंवा लहान बाळे असलेल्या स्त्रियांनी सती न जाण्याबद्दल उल्लेख आढळतो. गरुड पुराणांमध्ये सुद्धा गर्भवती स्त्रीने सती जाऊ नये असा उल्लेख आहे.

सद्‌गुरूचरित्रामध्ये सतीप्रथेबद्दल केलेले वर्णन

जवळ नसता आपुला पति।
त्याती जाहली असेल मृत्यूप्राप्ती।
काय करावे त्याचे सती।
केवी कराये सहगमन।
तुवा असेल गरोदरी।
असे तान्हा कुमार कुमरी।
काय करावे तैसिये नारी।

अलबेरूनीसारख्या इतिहासकारांनी नोंदवले आहे की, भारतात राण्यांनी सती जावे अशी अपेक्षा राज्यकर्ते करत असत. सती प्रथा प्रामुख्याने राजघराण्यांमध्ये आणि सरदार घराण्यांमध्ये अधिक अस्तित्वात होती. सती जाणारी स्त्री ‘पतिव्रता’ म्हणून समाजात आदरणीय मानली जात असे आणि सती जाणे हे एक प्रकारचे पुण्यकर्मच मानले जाई. अशा पुण्यवान स्त्रियांच्या त्यागाची आठवण म्हणून त्यांची स्मारके किंवा सतीशिळा बनवण्याची पद्धत त्याकाळी समाजात होती.

संशोधन कार्य आणि सहकार्य:

सदर संदर्भासाठी इतिहास अभ्यासक व विरगळ आणि सतीशिळा शास्त्रज्ञ श्री. अनिल दुधाने सर यांच्या ‘इतिहासाचे मूक साक्षीदार: विरगळ आणि सतीशिळा’ या पुस्तकातून मार्गदर्शन घेण्यात आल्याचे अभ्यासक स्नेहल बने यांनी सांगितले. दुधाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली इतर सतीशिळांचे अधिक अभ्यास कार्य चालू असल्याचेही बने यांनी नमूद केले.

या संशोधन कार्याला लिंगेश्वर-गांगोबा मंदिरातील पुजारी वर्ग भिकाजी शंकर गुरव व राजाराम गुरव, तसेच ग्रामस्थ श्यामसुंदर राणे, विजय राणे, मुरारी राणे, महादेव राणे, लक्ष्मण राणे, अपूर्वा राणे या मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले, असे अभ्यासक श्रीमती स्नेहल बने यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. या दुर्मिळ शोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ऐतिहासिक आणि सामाजिक अभ्यासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

Total Visitor Counter

2475432
Share This Article