GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये पोस्ट कर्मचाऱ्याकडून २ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

Gramin Varta
180 Views

चिपळूण: तालुक्यातील मूर्तवडे शाखा डाकघर येथे कार्यरत असलेल्या एका पोस्ट कर्मचाऱ्याने तब्बल २ लाख रुपयांचा अपहार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध सोमवारी सावर्डे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर यशवंत रहाटे (रा. मूर्तवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या पोस्ट कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुहागर येथील डाकघर निरीक्षक हिमांशू हरिश्चंद्र जोशी (वय २६) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर रहाटे याने मूर्तवडे शाखा डाकघरमध्ये काम करत असताना, खातेदार रामचंद्र महादेव मांडवकर व वासंती रामचंद्र मांडवकर (दोघेही रा. मूर्तवडे) यांची पाच वर्षांच्या मुदतीची (५ टीडी) खाती न उघडता चक्क बोगस पासबुक तयार केले. या बनावटगिरीच्या माध्यमातून त्याने खातेदारांच्या २ लाख रुपये इतक्या रकमेचा अपहार केला.

हा फसवणुकीचा प्रकार १८ डिसेंबर २०१७, ७ नोव्हेंबर २०१८ आणि २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत मूर्तवडे शाखा डाकघर येथे घडला. ज्ञानेश्वर रहाटे याने खातेदारांचे पैसे स्वतःच्या वापरासाठी घेतले आणि रकमेची कोणतीही नोंद रजिस्टरमध्ये केली नाही.

हा अपहार झाल्याची बाब डाक विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर, आरोपी ज्ञानेश्वर रहाटे याने अपहार केलेली रक्कम आणि टपाल विभागाच्या नियमानुसार मिळणारे व्याज अशी एकूण ३ लाख रुपयांची रक्कम डाक विभागाकडे भरणा केली आहे. तरीही, गुहागर उपविभाग शृंगारतळी येथील डाकघर निरीक्षक हिमांशू जोशी यांच्या तपासणीत ही फसवणूक उघडकीस आली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी ज्ञानेश्वर रहाटे याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Total Visitor Counter

2647871
Share This Article