संदीप घाग / चिपळूण : डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाने मेंदूशी संबंधित अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या आजारावर यश मिळवत वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मोलाचा टप्पा गाठला आहे. ‘स्पॉन्टेनियस सेरेब्रोस्पायनल फ्लूइड (CSF) रायनोरिया’ — या मेंदूतील पाणी नाकातून गळण्याच्या आजारावर येथे यशस्वी एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली.
४४ वर्षीय महिलेला नाकातून सातत्याने पाणी गळण्याचा त्रास होत होता. सुरुवातीला सर्दी समजून दुर्लक्षित झालेल्या या लक्षणांमागे मेंदूतील पाण्याची गळती असल्याचे निदान ENT विभागाच्या डॉ. राजीव केणी यांनी केले. तत्काळ उपचार सुरू करत रुग्णाला मेंदू शल्यचिकित्सक डॉ. मृदुल भाटजीवाले यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यांनी सीटी सिस्टर्नोग्राम तपासणीद्वारे गळतीचे अचूक स्थान निश्चित केले.
विशेष म्हणजे, मेंदू उघडण्याऐवजी नाकातून दुर्बिणीद्वारे (एंडोस्कोपिक) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. ENT, मेंदू शस्त्रक्रिया आणि भूलतज्ञांच्या संयुक्त टीमने अत्यंत अचूकतेने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पूर्ण केली.
रुग्ण सध्या पूर्णतः बरी असून कोणतीही गळती किंवा संसर्ग उरलेला नाही. ही शस्त्रक्रिया ‘महात्मा फुले आरोग्य योजने’अंतर्गत रुग्णासाठी मोफत करण्यात आली.
“पुणे-मुंबईसारख्या महानगरांतील सुविधा आता डेरवणमध्येही उपलब्ध आहेत,” असे मत डॉ. मृदुल भाटजीवाले यांनी व्यक्त केले.
कौतुकास्पद : मेंदूतील पाणी नाकातून गळत होते; दुर्मिळ आजाराने त्रस्त महिलेवर डेरवण रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
