योग्य ती कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टला कामबंद आंदोलन
तुषार पाचलकर / राजापूर
राजापूर तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आणि बार मालकांनी गोवा बनावटीच्या दारूविक्रीविरोधात आवाज उठवला असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने योग्य ती कारवाई न केल्यास १५ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात बार व हॉटेल मालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १३ जुलै २०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क मंत्री डॉ. उदय सामंत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत बैठक झाली होती. या बैठकीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूविक्रीविरोधात ठोस निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर मंत्री डॉ. उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, आजपर्यंत राजापूर तालुक्यात या दारू विक्रीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असे बार मालकांचे म्हणणे आहे.
राजापूरच्या शहरी आणि ग्रामीण भागात बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू सर्रास विकली जात असून, त्यामुळे स्थानिक व्यवसायांना मोठा फटका बसत आहे. अधिकृत बार मालकांना राज्य उत्पादन शुल्क, लायसन्स फी, मद्यदर वाढ यांचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र, बेकायदेशीर दारू माफिया स्वस्त दरात दारू विकून त्यांच्या व्यवसायावर घाला घालत आहेत.
या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्व बार व हॉटेल व्यावसायिकांनी एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे.
गोवा बनावटीच्या दारू विक्री विरोधात राजापूरमधील बार मालकांचा आंदोलनाचा इशारा
