दिनेश अंब्रे / संगमेश्वर
संगमेश्वर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, शांतता कमिटी सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “पोलिसांबद्दल भीती न ठेवता त्यांना आपला मित्र समजावे. कायद्याचे पालन करणाऱ्यांसाठी पोलीस व्यवस्था नेहमीच सहकार्य करणारी आहे. मात्र गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. जातीय तेढ पसरवणाऱ्यांना माफ केले जाणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “जनतेच्या अडचणी समजून घेणे, त्यावर सकारात्मक भूमिका घेणे हीच आमची प्राथमिकता आहे. शांतता राखण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये समन्वय हवा. त्यामुळे अशा बैठका अधिक प्रभावी ठरतात.”
या बैठकीत संगमेश्वर व्यापारी संघटनेचे अभय शेठ गद्रे, सुशांत कोळवणकर, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष खातू, गुरुप्रसाद भिंगार्डे, मापारी मोहल्ला संघटनेचे अध्यक्ष रऊफ खान, तसेच संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष वहाब दळवी, वरिष्ठ पत्रकार इजाज पटेल, इलियाज मापारी, दीपक तुळसणकर, नियाज खान, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी, माजी सभापती सुजित महाडिक, श्रीप्रकाश कोळवणकर आदींनी देखील उपस्थित राहून शांतता प्रस्थापनेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शेवटी उपस्थितांनी अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक – अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांचे मार्गदर्शन
