लांजा :तालुक्यातील वाटूळ-दाभोळे मार्गावरील विलवडे ग्रामपंचायत होळीचा मांड येथे रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या तीन महिलांना पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने जोरदार ठोकर दिल्याने या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून कार चालकावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम सोमा राडये (वय ५३, रा.विलवडे वाकिवाडी, ता.लांजा) यांनी लांजा पोलिसांत फिर्याद दिली आहे. जयश्री जयवंत कोंडसकर, योगीता चंद्रकांत चौगुले आणि वासंती चंद्रकांत मालपेकर (तिन्ही रा.वाकेड गावकरवाडी, ता.लांजा, जि.रत्नागिरी) या तिघी महिला आणि फिर्यादी शांताराम राडये हे मजुरीचे काम करतात. वाकेड येथून या तिन्ही महिला नेहमी विलवडे येथे मजुरीच्या कामासाठी जातात. नेहमीप्रमाणे त्या शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास त्या आपले काम आटोपून वाकेड येथे घरी येत होत्या.
वाटूळ-दाभोळे रस्त्यावरील शिरवली फाटा येथील विलवडे ग्रामपंचायत, होळीचा मांड येथे रस्त्याच्या कडेने या तिन्ही महिला चालत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने (एमएच.०१.ईजे ८५३५) या तिन्ही महिलांना जोरदार ठोकर देवून उडविले. या अपघातात जखमी झालेल्या तिन्ही महिलांना प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघातात किरकोळ जखमी असलेल्या जयश्री कोंडसकर या महिलेवर उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या योगीता चौगुले व वासंती मालपेकर या दोन्ही महिलांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताप्रकरणी स्विफ्ट डिझायर कारचालक नितीन चंद्रकांत परब (वय ४७, रा.माहीम, मुंबई) याच्यावर भरधाव वेगाने कार चालवित तिन्ही महिलांच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (अ), (ब), मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.
लांजा येथे भरधाव कारने 3 महिलाना उडवले; दोघी जखमी, रत्नागिरीला हलवले
