रत्नागिरी (प्रतिनिधी) – गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यात एकूण २० ठिकाणी वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही सर्व केंद्रे २२ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत २४ तास सेवा देणार आहेत.
या तपासणी केंद्रांवर आरोग्य तपासणी पथके महामार्गावरील प्रमुख ठिकाणी तसेच रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन बैठकीत या उपक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्याच्या मुख्य प्रवेशद्वारांवर आणि गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाद्वारे गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी सर्व चाकरमान्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने या सर्व ठिकाणी तपासणीसाठी आवश्यक मंडप आणि इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना एक सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासाची खात्री मिळाली आहे.