लांजा, (प्रतिनिधी)- लांजा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे नदी पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती पुराच्या प्रवाहात वाहून गेली आहे. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून, लांजा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून बेपत्ता व्यक्तीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपासून लांजा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
प्रभानवल्ली येथे दोन व्यक्ती नदी पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे दोघेही पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये सापडले. यापैकी एक जण सुखरूपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला, मात्र दुसरा व्यक्ती पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे अधिकारी, तहसीलदार आणि महसूल विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी लांजा पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ आणि तरुण मंडळी मदतीला धावली आहेत. मात्र, पाण्याचा वेग अधिक असल्याने शोधकार्यात अडथळे येत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यातून प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे.