GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरचे सुपुत्र रांगोळी कलाकर सूरज धावडे यांची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

संगमेश्वर : वांझोळे येथील कलाशिक्षक सूरज दत्ताराम धावडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या रांगोळीची नोंद जगातील सर्वांत मोठी रांगोळी म्हणून झाल्याचे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १२ ऑगस्ट २०२५ रोजी घोषित केले आले आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रोहा (जि. रायगड) येथे ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली होती. शिवराज्याभिषेक सोहळ्याची १,२५,००० चौरस मीटर आकाराची रांगोळी साकारण्यासाठी १०० कलाकारांनी एकत्र येऊन ५००० किलो रांगोळी वापरत ७० तासांमध्ये ही रांगोळी पूर्ण केली होती.

वांझोळे गावचे माजी सरपंच व रिक्षा व्यावसायिक दत्ताराम धावडे यांचे सूरज हे सुपुत्र आहेत. सूरज यांचे प्राथमिक शिक्षण वांझोळे जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शिक्षण शिवाजी माध्यमिक विद्यालय आणि पुढे आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातून २००९ मध्ये बारावी वाणिज्य शाखेतून झाले. २०१४ मध्ये पुणे येथील सुप्रसिद्ध अभिनव कला महाविद्यालयातून गव्हर्न्मेंट ड्रॉईंग डिप्लोमा इन ड्रॉईंग अँड पेंटिंग (जी. डी. आर्ट) उत्तम गुणांनी पूर्ण केला. त्यानंतर कोल्हापूरच्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून ६ वर्षे काम केले. पुण्यात दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये ते गेली २ वर्षे कलाशिक्षक आहेत.

सूरज यांच्या चित्रांची महाराष्ट्र कला प्रदर्शनास सलग दोन वर्षे विद्यार्थी गटातून निवड झाली होती. कॅमल आर्ट फाउंडेशनच्या कला प्रदर्शनासाठी २ वेळा निवड झाली होती, यामध्ये ते एकदा विद्यार्थी गटातून तर दुसऱ्या वेळी व्यावसायिक गटातून सहभागी झाले होते. पुण्यातील व्ही. व्ही. ओक राष्ट्रीय कला प्रदर्शनात सलग २ वर्षे निवड झाली होती. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय कलाप्रदर्शनातील व्यावसायिक गटातून २ वेळा निवड झाली होती. तसेच दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या अखिल भारतीय कला प्रदर्शनातील व्यावसायिक गटात निवड झाली होती.

श्री. सूरज यांना विविध स्पर्धा व प्रदर्शनामध्ये पुरस्कार व पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

सूरजच्या यशाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, डॉ. सदानंद आग्रे, परिसरातील मित्रमंडळी आणि वांझोळे पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.

Total Visitor Counter

2475015
Share This Article