GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रत्नागिरी पोलिस, अग्निशमन दलाने वाचवले

माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांनी धाडसाने छतावर चढून खाली उतरवले

रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानकावर एका मनोरुग्ण तरुणाने लिफ्टवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र रत्नागिरी पोलीस, रेल्वे सुरक्षा दल (RPF), अग्निशमन दल आणि एका मनोरुग्ण सेवकाच्या तात्काळ आणि समन्वित प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचले. ही घटना काल रात्री ९.४५ च्या सुमारास घडली.

रात्री ९.४५ च्या सुमारास रत्नागिरी पोलीस स्टेशनमधून एएसआय सावंत साहेब यांना रेल्वे स्थानकावरील लिफ्टवर एक तरुण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चढल्याचा कॉल आला. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवण्याची विनंती केली. नगर परिषदेतील विचारे साहेब यांनी या विनंतीला मान देऊन तात्काळ अग्निशमन दल आणि त्यांची टीम रेल्वे स्थानकाकडे रवाना केली.
दरम्यान, आरपीएफचे विधाते साहेब यांच्याशी संपर्क साधल्यावर तो तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले. यामुळे तात्काळ मनोरुग्ण सेवक सचिन शिंदे यांना बोलावण्यात आले आणि त्यांनीही तातडीने रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. यावेळी आरपीएफ हेड विधाते साहेब आणि नुकतेच रुजू झालेले पीआय विवेक पाटील साहेब हेही आपल्या ताफ्यासह परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज होते.

तरुणाला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. सचिन शिंदे त्या तरुणाची मनधरणी करत होते, तर शहर पोलीस निरीक्षक पाटील साहेब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनीही त्याला समजावून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. अखेर, सचिन शिंदे यांनी धीराने तरुणाकडे हात पुढे करून त्याचा हात पकडला. याच संधीचा फायदा घेत सुहेल मुकादम यांनी वेगाने शिडीवर चढून त्या तरुणाला वरती जाऊन पकडले आणि पूर्णपणे ताब्यात घेतले.

पोलीस आणि सचिन शिंदे यांनी त्या तरुणाला पुढील उपचारासाठी दाखल केले असून त्याच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पोलीस, अग्निशमन दल आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेचे आणि समन्वयाचे कौतुक होत आहे, ज्यामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव वाचू शकला.

Total Visitor Counter

2455607
Share This Article