दाम्पत्य आत्महत्या प्रकरण
चिपळूण : शहरातील गांधारेश्वर पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या नवविवाहित आत्महत्या केली होती. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह हाती लागला होता परंतु तिच्या पतीचा मृतदेह आढळला नव्हता. नातेवाईक 5 दिवस परिसर पिंजून काढत होते. अखेर आज रविवारी निलेश अहिरे याचा मृतदेह मालदोली खाडीत आढळून आला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी नीलेशची पत्नी अश्विनी अहिरे हिचा मृतदेह सापडला होता.
निलेश अहिरे (मूळगाव साक्री, जि. धुळे) हे शिक्षणासाठी चिपळूणमध्ये आले होते. डीबीजे महाविद्यालयातून बारावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मोबाइल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बसस्थानकाजवळ मोबाइल शॉपी सुरू करून व्यवसायात स्थिरता मिळवली. मृदू स्वभाव आणि सचोटीच्या जोरावर त्यांनी सामाजिक ओळख निर्माण केली होती.
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यानंतर निलेश यांनी स्वतंत्र वास्तव्य करत नवजीवन सुरू केले. ८ मे २०२५ रोजी अश्विनीशी विवाहबद्ध झाले. विवाहानंतर दोघांनी संसारात आनंदाने सुरुवात केली होती. पर्यटनस्थळांना भेटी, वाढदिवसाचा उत्सव आणि कुटुंबीयांचा सहवास अशा अनेक सुखद क्षणांमुळे नवदांपत्याचं आयुष्य आनंदात सुरू होतं. मात्र बुधवार, ३० जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता अचानक दोघांनी गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिस, एनडीआरएफ आणि प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली. त्यात गुरुवारी अश्विनीचा मृतदेह सापडला. रविवारी निलेश याचाही मृतदेह दाभोळजवळील मालदोली खाडीत आढळला. स्थानिक बोटी आणि किनारी गावातील नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू होतं.
या आत्महत्येमागील कारण अद्यापही गुलदस्त्यात असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल रेकॉर्ड आणि कुटुंबीयांचे जबाब याच्या आधारे तपास पुढे सुरु आहे.
चिपळूण ब्रेकिंग : अखेर निलेशचा 5 दिवसांनी मृतदेह सापडला
