GRAMIN SEARCH BANNER

राज्यातील अ‍ॅपआधारित रिक्षा-टॅक्सींचा गुरुवारी बंद, परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधणार

Gramin Varta
162 Views

मुंबई: कायदे-नियम धाब्यावर बसवणाऱ्या ओला, उबेर आणि रॅपिडोवर कठोर कारवाई करण्यात परिवहन विभाग अपयशी ठरला आहे. या निषेधार्थ राज्यातील अ‍ॅपआधारित कॅब, रिक्षा आणि टॅक्सींनी गुरुवार, 9 ऑक्टोबरला बंद पुकारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान प्रवासी सेवा बंद ठेवून परिवहन विभागातील भ्रष्टाचाराकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. ओला, उबेर, रॅपिडो या तीनही कंपन्या सरकारी नियम पायदळी तुडवून बेकायदेशीरपणे सेवा देत असल्याचा आरोप भारतीय गिग कामगार मंचाने केला आहे.

संबंधित अ‍ॅग्रीगेटर्सविरोधात अनेक एफआयआर दाखल केल्यानंतरही खासगी दुचाकीवरून प्रवासी सेवा सुरू आहे. याला परिवहन विभागातील भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. इंधन व देखभाल खर्चात मोठी वाढ झाली असतानाही कॅब, रिक्षा आणि टॅक्सीचालकांचे उत्पन्न कमी आहे. यासंदर्भातील कॅब, रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या तक्रारींकडे परिवहन विभाग दुर्लक्ष करीत आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘रॅपिडो’ कंपनीकडून घेतलेल्या स्पॉन्सरशिपमुळे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना कंपन्यांसमोर झुकावे लागत आहे, असा दावा भारतीय गिग कामगार मंचाचे अध्यक्ष डॉ. केशव क्षिरसागर यांनी केला आहे. गुरुवारी लाक्षणिक बंद पुकारून कॅब, रिक्षा आणि टॅक्सीचालकांना चांगले वेतन, विमा लाभ, पारदर्शक भाडेरचना आणि अ‍ॅप कंपन्यांकडून मनमानीपणे चालकांची खाती निलंबित करणे थांबवावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे.

प्रवासी सेवेवर मोठा परिणाम होणार

देशभरातील वित्त विषयाचे तज्ञ येत्या गुरुवारी वांद्रे-कुर्ला संकुल येथील परिषदेला येणार आहेत. त्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे बीकेसी परिसरातील वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच अ‍ॅप आधारित कॅब, रिक्षा आणि टॅक्सीच्या चालकांनी लाक्षणिक बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवासी सेवेवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

Total Visitor Counter

2651782
Share This Article