संगमेश्वर : गणेशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण मानला जातो. या उत्सवासाठी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो चाकरमानी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गावाला येतात. मात्र, अतिवृष्टी आणि ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे सध्या या महामार्गाची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग सुस्थितीत करावा, अशी विनंंती धामणी येथील युवा कार्यकर्ते सचिन यादव यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्ह्याचे खासदार, पालकमंत्री, आमदार सर्व लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महामार्ग सुस्थितीत करून सर्व गणेशभक्तांचा प्रवास सुखकारक होईल याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवापूर्वी लोकप्रतिनिधींनी सर्व विभागांची बैठक घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत चर्चा करावी.
महामार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडून टाकावी तसेच महावितरणने गणेशोत्सवात वीज पुरवठा खंडीत न करता तो सुरळीत चालू ठेवावा अशा सुचना सर्व विभागांना द्याव्यात. गणेशोत्सव जवळ आला असून, हा कोकणातील सर्वांत मोठा उत्सव आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपल्या गावी स्वत: च्या वाहनाने किंवा एस. टी. बसेस आणि खासगी वाहनांतून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने येत असतात. परंतु, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाला नियुक्त केलेल्या ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे म्हटले जात आहे.
सध्या संगमेश्वर तालुक्यातील काही ठिकाणी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे. फक्त काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम हे ९५ टक्के पूर्ण झाले आहे तरी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वरील रस्त्याची कामे संथगतीने सुरू आहेत ती जलदगतीने करण्यासंदर्भात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींची एक संयुक्त बैठक प्रत्यक्ष तातडीने घ्यावी व रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, अशी विनंती सचिन यादव यांनी केली आहे.
महामार्ग की खड्डेमार्ग; संगमेश्वरात खड्ड्यांनी वाहन चालक हैराण, गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुरळीत करा !
