GRAMIN SEARCH BANNER

मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न

Gramin Varta
194 Views

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये घुमले सनई-चौघड्यांचे मंजूळ सूर

लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मार्लेश्वर तीर्थक्षेत्री चोख पोलीस बंदोबस्त

देवरुख – राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री. चि. देव मार्लेश्वर व साखरप्याची चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) आज बुधवारी दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सनई चौघड्यांचे मंजूळ सुर घुमले. तर विवाह सोहळा संपन्न होताच उपस्थित लाखो भाविकांनी हरहर महादेव… हरहर मार्लेश्वर.. शिवहराचा जयघोष करीत सह्याद्री पर्वतरांगा दणाणून सोडल्या.

संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या कडे-कपारीत निसर्गरम्य ठिकाणी स्वयंभू श्री. देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. मकरसंक्रांत दिनी मार्लेश्वर शिखरावर मार्लेश्वर- गिरीजादेवीचा विवाहसोहळा लाखो भाविकांच्या साक्षीने हिंदू लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार आज बुधवारी दुपारी संपन्न झाला. या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी दोन दिवस अगोदरपासूनच मार्लेश्वर तीर्थक्षेत्री सुरू होती.

मार्लेश्वराची पालखी, गिरीजादेवीची पालखी व यजमान व्याडेश्वराची पालखी या तिन्ही पालख्यांचे बुधवारी सकाळी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री वऱ्हाडी मंडळींसह आगमन झाल्यानंतर मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान आदी विवाह सोहळ्यापूर्वीचे प्रथेपरंपरेप्रमाणे सर्व विधी पार पडले. यानंतर विवाह सोहळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी तब्बल ३६० मानकरी यांना अगत्यपूर्वक निमंत्रण देण्यात आले. मार्लेश्वर व गिरीजादेवीच्या विवाह सोहळ्याला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आंगवलीचे अणेराव मार्लेश्वरचा टोप मांडीवर घेऊन तर लांजेकर स्वामी गिरिजादेवीचा टोप मांडीवर घेऊन बसले. यावेळी लिंगायत धर्मीय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करून मंगलाष्टकांनी विवाहसोहळा दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर रायपाटणकर स्वामी, म्हासोळकर स्वामी, धारेश्वर स्वामी आणि लांजेकर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी आपल्या डोळ्यात हा अभूतपूर्व विवाह सोहळा साठवून ठेवला. तर सनई चौघड्यांचे मंजुळ सूर सह्याद्रीच्या कडेकपारीत पर्वतरांगांमध्ये घुमले. या विवाहसोहळ्याला शिवसेना ठाकरे गटाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला संघटक सौ. नेहा माने, संतोष केदारी, प्रद्युम्न माने, शिवसेना शिंदे गटाचे सचिन मांगले, प्रसाद सावंत आदी उपस्थित होते. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस निरिक्षक उदय झावरे यांच्यासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर यासोबत देवरूख आगाराच्यावतीने दिवसभर जादा बसेसच्या फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. तसेच आरोग्य विभाग व महावितरण विभागही तैनात होता.

Total Visitor Counter

3073091
Share This Article