रत्नागिरी, (प्रतिनिधी): गद्रे कंपनीमध्ये झालेल्या किरकोळ अमोनिया गळतीमुळे ठप्प झालेली रत्नागिरी विमानतळ मार्गावरील बससेवा अखेर सुरू झाली आहे. मजगावचे सरपंच फैयाज मुकादम आणि युवासेना अधिकारी मुज्जू मुकादम यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
आज सकाळी गद्रे कंपनीत अमोनियाची किरकोळ गळती झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ मार्गे धावणारी एसटी बससेवा थांबवण्यात आली होती. त्यामुळे मारुती मंदिर ते विमानतळ या मार्गावरील सर्व थांब्यांवर विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे हाल झाले. नेहमीप्रमाणे आपली कामे संपवून मजगावला परतत असताना सरपंच फैयाज मुकादम आणि मुज्जू मुकादम यांना रस्त्यात एकही बस दिसली नाही. चौकशीअंती त्यांना सकाळी झालेल्या गॅस गळतीची माहिती मिळाली.
या घटनेनंतर कंपनीचे कामकाज सुरू झाले असले, तरी एसटी प्रशासनाला याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे एसटी बस दुपारपर्यंत जे.के. फाईल मार्गे वळवण्यात येत होत्या. प्रशासनातील संबंधित विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे प्रवाशांची गैरसोय वाढत असल्याचे पाहून फैयाज मुकादम आणि मुज्जू मुकादम यांनी तातडीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असल्याचे एसटी प्रशासनाला कळवण्यात आले आणि बससेवा पूर्ववत सुरू झाली. यामुळे प्रवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.