मुंबई :मुंबई, पुणे, नागपूरसह १५ महापालिकांमध्ये महापौरपदाच्या खुर्चीत विराजमान होण्याचा बहुमान महिलांना मिळणार आहे. राज्यातील २९ ठिकाणच्या महापौरपदाची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली.
शिवसेनेने (ठाकरे) मात्र मुंबईत महापालिका आरक्षणावर आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार आरक्षण सोडत काढण्यात आल्याचा आरोप केला. सरकारने हा आरोप फेटाळला आहे.
नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महापौर आरक्षण सोडत काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून, २९ पैकी १५ महापालिका विविध प्रवर्गांतील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. या सर्व महानगरपालिकांपैकी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक पद आरक्षित होत आहे, तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ३ पदे आरक्षित झाली आहेत. त्यापैकी २ पदे अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी ८ पदे आरक्षित झालेली असून, त्यापैकी ४ पदे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहेत. तर उर्वरित १७ महानगरपालिकांमधून सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी ९ पदे राखीव झाली असून उर्वरित ८ महापालिकांमधील महापौरपदे सर्वांसाठी खुली आहेत.
ठाकरे गटाचा आक्षेप
महापौरपदाची सोडत सुरू असतानाच मुंबईमध्ये सलग दोन वेळा महापौरपद खुले असतानाच आता पुन्हा कसे खुले झाले अशी विचारणा करीत शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या सोडतीस आक्षेप घेतला. तर काँग्रेसच्या वतीनेही परभणीत दोन वेळा तेच आरक्षण ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मुंबई महापालिकेत सलग दोन वेळा महापौरपद खुले असताना आता अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण का नाही अशी विचारणा पेडणेकर यांनी केली. सरकारने त्यांच्याकडे ज्या पक्षाचे नगरसेवक नाहीत त्यांचे आरक्षण मुंबईत पडू नये याची खबरदारी घेतली असून ही सोडत ठरवून काढल्याचा आरोपही पेडणेकर यांनी केला.
माधुरी मिसाळ यांनी ठाकरे गटाचे सर्व आरोप निराधार असून ही सोडत नियमानुसार आणि सर्वांच्या समोर काढण्यात आल्याचे सांगितले. ठाकरे गटाचे आरोप नियमाला धरून नव्हते. तसेच काँग्रेसच्या काही जणांचा गैरसमज झाला होता असेही मिसाळ यांनी स्पष्ट केले.
महापौरपदासाठी आरक्षण
●कल्याण-डोंबिवली :अनुसूचित जमाती
●ठाणे :अनुसूचित जाती
●जालना :अनुसूचित जाती महिला
●लातूर :अनुसूचित जाती महिला
●पनवेल :नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
●जळगाव :नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
●चंद्रपूर :नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
●अहिल्यानगर :नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
●अकोला:नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
●इचलकरंजी :नागरिकांचा मागास प्रवर्ग
●कोल्हापूर :नागरिकांचा मागास प्रवर्ग
●उल्हासनगर :नागरिकांचा मागास प्रवर्ग
●पुणे :सर्वसाधारण महिला
●धुळे :सर्वसाधारण महिला
●बृहन्मुंबई :सर्वसाधारण महिला
●नवी मुंबई :सर्वसाधारण महिला
●नांदेड-वाघाळा :सर्वसाधारण महिला
●मालेगाव :सर्वसाधारण महिला
●मीरा-भाईंदर :सर्वसाधारण महिला
●नागपूर :सर्वसाधारण महिला
●नाशिक :सर्वसाधारण महिला
खुला प्रवर्ग
छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, अमरावती, वसई-विरार, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी-निजामपूर
महापौरपद सोडतीमध्ये २९ पैकी १५ ठिकाणी संधी; प्रमुख शहरांत महिला कारभार





