रत्नागिरी : मराठी भाषेसाठी नावीन्यपूर्ण ‘भाषानिधी’ उपक्रम

saurabhsalvi26@gmail.com
3 Min Read

रत्नागिरी: मराठी भाषेची गोडी वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन-लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी येथील प्रा. निधी पटवर्धन यांनी ‘भाषानिधी’ नावाचा मासिक स्पर्धेचा नावीन्यपूर्ण उपक्रम समाजमाध्यमात सुरू केला आहे.

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच भाषिक कौशल्य विकसित करण्याची संधी देणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित वाहिनीचे सभासद होणे आवश्यक असून, दर महिन्यातील व्हिडीओमधून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी संदर्भासह लिहिणे अपेक्षित आहे. अचूक व संदर्भपूर्ण उत्तरांना अधिक गुण दिले जाणार आहेत.

स्पर्धेतील सर्वाधिक अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या शहरातील हॉटेलमध्ये भोजनाची संधी व शालेय मराठी शब्दकोशासोबत भेटवस्तूंचा खजिना सुरेख बास्केटमधून मिळणार आहे. एकाहून अधिक विद्यार्थी पात्र ठरल्यास चिठ्ठीद्वारे विजेता निवडला जाणार आहे. याशिवाय वर्षभरात सर्वाधिक सहभाग घेऊन उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्याला तसेच त्याच्या मराठी शिक्षकाला भारतातील मराठी संस्कृतीशी निगडित स्थळांचे दोन दिवसांचे प्रवासदर्शन भेट म्हणून देण्यात येणार आहे.

स्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या निर्णयावर अवलंबून राहणार असून, त्याबाबतचे सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिरुची निर्माण करण्यासोबतच अभ्यासाची गोडी वाढविणारा हा ‘भाषानिधी’ उपक्रम आहे.

वेगवेगळ्या बोलीभाषा, सोशल मीडियावर उडणारी मराठी भाषेची धूळदाण, अन्य भाषांमधील शब्दांनी केलेला शिरकाव यामुळे प्रमाण मराठी भाषेत झालेली घुसखोरी हा चिंतेचा विषय आहे. ही सांस्कृतिक, शाब्दिक घुसखोरी रोखण्यासाठी प्रमाण मराठी भाषेचा प्रसार करण्याकरिता डॉ. पटवर्धन यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.

एखाद्या गोष्टीला नेमका मराठी शब्द काय वापरावा, हे अनेकदा लक्षात येत नाही. अशावेळी नेमका शब्द शोधण्याऐवजी तेथे इंग्रजी शब्द वापरून वेळ मारून नेली जाते. त्याचा तसाच वापर लिखित भाषेतही केला जातो. त्यामुळेच मराठी भाषेत अन्य भाषेतील शब्दांनी मोठी घुसखोरी केली आहे. मराठी भाषेतील शब्दांचे भांडार यानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून खुले करून योग्य ते शिकवण्याचे काम या उपक्रमातून केले जाणार आहे.

राज्य मराठी विकास संस्थेने तयार केलेला शालेय मराठी शब्दकोश शाळा-शाळांमध्ये फिरून, पालक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम यापूर्वी डॉ. निधी पटवर्धन यांनी २०१८ मध्ये हाती घेतला होता. त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता. डॉ. पटवर्धन या गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात कार्यरत असून एमए, नेट, पीएचडी आहेत. त्या पीएचडी गाइड (मुंबई विद्यापीठ) म्हणून काम करत आहेत. ‘पिंटी’ हा त्यांचा कथासंग्रह नांदेड येथील रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एमए – भाग १ साठी अभ्यासक्रमात आहे. रत्नागिरीजवळच्या भाट्ये झोपडपट्टीत त्या बिनभिंतींचे ग्रंथालय चालवतात. तसेच त्यांनी मराठी भाषासुंदरी या संगीतमय कार्यक्रमाचे लेखन व निवेदनही केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *