GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: पाण्यासाठी असुर्डे ग्रामस्थांचा एल्गार; १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार ‘हंडा मोर्चा’

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे असुर्डे येथील पाणी समस्या अत्यंत गंभीर बनली असून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ दिवसांत गाव तळीचे रखडलेले काम सुरू न झाल्यास ८ मे २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर भव्य ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. असुर्डे प्रभाग २ मधील मणवेवाडी, पाताडेवाडी, गुरववाडी, कुळ्येवाडी आणि लोहारवाडी या भागांना सध्या ‘बोडकीचा बंधारा’ येथून पाणी पुरवठा होतो, मात्र दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात हा बंधारा कोरडा पडत असल्याने या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण होते.

या समस्येवर उपाय म्हणून जल जीवन मिशनअंतर्गत गाव तळीचे खोदकाम मे २०२५ मध्ये करण्यात आले होते, परंतु वर्षभरानंतरही हे काम बंद अवस्थेत आहे. खोदकामामुळे पाण्याचा जुना नैसर्गिक स्त्रोतही बंद झाला असून भर उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पालकमंत्री, खासदार आणि आमदारांनाही निवेदन पाठवले आहे. कंत्राटदाराने अर्धवट खोदकाम करून ठेवल्याने नैसर्गिक स्त्रोत बाधित झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गाव तळीचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, बोडकीचा बंधारा व जॅकवेलमधील गाळ काढावा आणि पाणी स्त्रोत बळकट करण्यासाठी पाझर तलावासारखी जलसंधारणाची कामे करावीत, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. प्रशासनाने १५ दिवसांत सकारात्मक पाऊल उचलले नाही तर ८ मे रोजी होणाऱ्या हंडा मोर्चावर आम्ही ठाम राहू, असा निर्धार सरपंच प्रदीप शिंदे यांच्यासह ५० हून अधिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

3430520
Share This Article