देवरूख: ज्या चपळाईने तिने खो-खोच्या मैदानावर अनेक बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना हुलकावणी दिली आणि ज्या जिद्दीने आपल्या संघाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून दिले, तीच मैदानावरची ‘सुवर्णकन्या’ तेजस्विनी सनगले काळाच्या पुढ्यात मात्र हतबल ठरली. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचा दबदबा निर्माण करणारी वांझोळेची ही लाडकी खेळाडू बुधवारी रात्री कोल्हापूर येथे मृत्यूशी झुंज देताना कायमची हरली. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात तेजस्विनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तेव्हापासून कोल्हापूरच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, काळाने तिच्यावर झडप घातल्याने संगमेश्वर तालुक्यासह महाराष्ट्राच्या खो-खो जगतावर शोककळा पसरली आहे.
संगमेश्वरमधील वांझोळे गाव हे गेल्या काही वर्षांत खो-खोच्या पंढरीसारखे नावारूपाला आले असून तेजस्विनी ही या परंपरेतील एक तेजस्वी हिरा होती. उंचीने लहान असली तरी विजेच्या चपळाईने मैदानावर वावरणाऱ्या तेजस्विनीने भुवनेश्वर येथे झालेल्या १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाची छाप पाडत संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. जिल्हा परिषद शाळेत असतानाच राष्ट्रीय खेळाडू बनण्याचा बहुमान तिने मिळवला होता. मैदानावरची कठीण परिस्थिती आपल्या अंगावर घेऊन खिंड लढवणारी तेजस्विनी आयुष्याचा सामना मात्र जिंकू शकली नाही, ही भावना आज प्रत्येक क्रीडाप्रेमीच्या काळजाला चटका लावून जात आहे. तिच्या अकाली जाण्याने सनगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रत्नागिरी खो-खो परिवाराची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.








