रत्नागिरी प्रतिनिधी : स्थानिक लोककला आणि संस्कृती यांचे जतन होण्याच्यादृष्टीने तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नाखरे नं.१ मध्ये आयोजित केलेल्या श्रावणधारा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे या कवितेने इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी केली. सृष्टीपूजनानिमित्ताने भक्तिमय आरती करून अंगणवाडी सेविका मंगला चव्हाण यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले.
पारंपारिक वेशभूषा करून मुलींनी टिपरीनृत्य, गौरी गणपतीची गाणी, फुगडी, मंगळागौर खेळ, उखाणे यांचे उत्साहात सादरीकरण करीत कोकणातील प्रसिद्ध जाखडीनृत्याचा फेरही धरला. आपल्या स्थानिक लोककला जपल्या जाव्यात, भारतीय परंपरा अबाधित रहाव्यात म्हणून प्रतिवर्षी हा उपक्रम शाळेत राबविला जातो. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक राजेंद्र भिंगार्डे यांनी पोषक आहाराविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले.यावेळी मुलांना चणे चुरमुरे देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक सुहास वाडेकर, श्रावणी केळकर, मदतनीस योगिता शिंदे, अपेक्षा नार्वेकर, पूजा धुळप, मनिषा धुळप आणि पालकांचे विशेष सहकार्य लाभले. शालेय अभ्यासासह विदयार्थ्यांना उपयुक्त भविष्यकालीन अनुभवांची योजना आदर्श शाळा नाखरे नं. १ मध्ये वेळोवेळी करण्याबाबत शा. व्य. स. अध्यक्ष रामदास लांजेकर आणि सदस्य, सरपंच विद्या जाधव, उपसरपंच विजय चव्हाण, केंद्रप्रमुख रिहाना म्हसकर, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, गटशिक्षणाधिकारी डॉ. सोपनूर यांनी शिक्षक आणि विद्यार्थी, पालक यांचे विशेष कौतुक केले आहे.