GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील टपाल भरतीत लातूर, नांदेडच्या तरुणांची बोगस प्रमाणपत्र; दोघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
312 Views

रत्नागिरी : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धकांकडून अनेकदा चुकीचे मार्ग अवलंबले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार रत्नागिरी येथील मुख्य डाकघर कार्यालयात उघडकीस आला आहे. टपाल विभागाच्या भरती प्रक्रियेत नोकरी मिळवण्यासाठी चक्क बोगस प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था (नोएडा) यांची बनावट प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर आणि नांदेड येथील दोन उमेदवारांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रत्नागिरी येथील मुख्य डाकघर कार्यालयात ३१ जुलै २०२३ ते २१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत टपाल विभागाची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी अनंत मारोती शेळके (वय २२, रा. कोकणगा, लातूर) आणि लंकेश नामदेव राठोड (वय २५, रा. शिरढोन, ता. कंधार, जि. नांदेड) या दोन उमेदवारांनी भरतीसाठी सादर केलेली कागदपत्रे संशयास्पद असल्याचे आढळून आले. या दोघांनीही नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था, नोएडा (NIOS) यांची १० वी किंवा १२ वीची शैक्षणिक प्रमाणपत्रे सादर केली होती. मात्र, डाक विभागाने केलेल्या सखोल छाननीमध्ये ही प्रमाणपत्रे खरी नसून ती पूर्णपणे बोगस व बनावट असल्याचे सिद्ध झाले.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे या दोघांनी टपाल विभागात घुसखोरी करून शासनाची दिशाभूल करण्याचा आणि फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहाय्यक डाकघर अधीक्षक (मुख्यालय) ज्ञानेश श्रीपाद कुलकर्णी (वय ३८) यांनी तातडीने कायदेशीर पावले उचलली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात २४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम ४६५, ४६८ आणि ४७१ अन्वये फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. परजिल्ह्यातील उमेदवारांनी रत्नागिरीत येऊन बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी लाटण्याचा केलेला हा प्रयत्न प्रशासनाच्या सतर्कतेमुळे फसला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3073090
Share This Article