रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारी (ता. १५) दुपारनंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे भातकापणीसह झोडणीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. जिल्ह्यातील ४४ गावांतील सुमारे ३६ हेक्टर भातक्षेत्राला फटका बसल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
सुदैवाने, दिवसभर कडकडीत ऊन पडल्यामुळे भिजलेले भात सुकण्यास मदत झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले तसेच पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आज भात कापणीच्या कामात सावध भूमिका घेतली होती.
सलग दोन दिवस कडकडीत ऊन पडल्यामुळे भातकापणीच्या कामांची लगबग होती. बुधवारी दुपारी अचानक आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कामाचे गणितच बिघडून गेले होते. अचानक आलेल्या पावसामुळे कापणी करून सुकण्यासाठी ठेवलेले भात सुरक्षितपणे घरी आणण्याची उसंतच शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे अनेक भागात कापणी केलेले भात भिजून गेले.
खळ्यामध्ये भातझोडणी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने तेही काम अर्धवट स्थितीमध्ये शेतकऱ्यांना ठेवावे लागले होते. दिवसभर तालुक्यामध्ये निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असे वातावरण राहिले होते. त्यामुळे शेतशिवारांमध्ये पुन्हा एकदा भातकापणी आणि झोडणीच्या कामांची लगबग राहिली होती. कालच्या परतीच्या पावसामध्ये भिजलेले भात शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा सुकवले जात होते. अर्धवट स्थितीतील भातझोडणीचे काम पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांनी आज भर दिला होता.
परतीचा पाऊस कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने भातकापणी आणि झोडणीची कामे करताना शेतकऱ्यांनी मात्र, सावध भूमिका घेतल्याचे दिसत होते. दरम्यान जिल्ह्यात पावसामुळे ३६ हेक्टर क्षेत्रावरील भात भिजून काहीअंशी नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी उभी भातरोपं आडवी झाल्यानेही त्यामधून उत्पन्न मिळणे दुरापास्त आहे. त्यात ३५.२० हेक्टर भातक्षेत्र, नाचणी ०.९० हेक्टरचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करा, अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे मंडणगड तालुक्यातील अनेक नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. तालुका प्रशासनाने सादर केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण १३.९२ लाखांचे नुकसान नोंदवले गेले. अतिवृष्टीमुळे घरे, गोठे, जनावरे आणि शेती नुकसानपोटी एकूण ५.३७ लाखांचे अनुदाने तालुक्यात वाटप करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे ३६ हेक्टरवर पिके बाधित
