डोंबिवली : महाराष्ट्रातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वपूर्ण क्रिकेट दौऱ्यासाठी नुकताच महाराष्ट्राचा संघ रवाना झाला असून, या संघात कल्याण-डोंबिवली परिसरातील तब्बल ७ गुणवान खेळाडूंचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, कल्याणच्या ‘संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी’चा संघ सलग १७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आणि उच्च प्रशिक्षणासाठी परदेशी दौऱ्यावर गेला आहे.
हा दौरा २३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा आणि विशेष सरावासाठी राज्यातील १४ खेळाडूंचा चमू सामील झाला आहे.
संघात समावेश असलेल्या खेळाडूंची नावे :
रुद्र मेढी, साई पाटील, घनामृत पाटील, कृष्णा धामी, यश भुरभूडा, अंश यादव, शार्दुल मुराडे, सात्विक कारेकर, क्षितिज बिरे, राजवीर कुटे, देवांश सोनावणे, नक्श सिंग, सार्विल दिवटे आणि वेदिका कुंभार्डे यांचा या संघात समावेश आहे.
उच्च प्रशिक्षणाची संधी
या दौऱ्यात, संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीतर्फे निवडलेले महाराष्ट्राचे संघ दोन दिवस-रात्र आणि सहा टी-२० सामने खेळणार आहेत. या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मॉर्केल बंधू आणि लायन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक कर्ट हुमन यांच्याकडून उच्च प्रशिक्षणाचे धडे मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांच्या खेळाला नवी दिशा मिळेल.
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील प्रसिद्ध ‘क्रिकेट क्लब ऑफ ईस्टर्न क्रिकेट अकॅडमी’ने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. आयोजक संतोष पाठक यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, या क्रिकेट प्रशिक्षण आणि सामन्यांच्या माध्यमातून भारतीय तरुण खेळाडूंना निश्चितच मोठा फायदा होईल. या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून परेश हिंदुराव मार्गदर्शन करत आहेत. या युवा चमूला माजी आमदार संजय दत्त, ब्रिजकिशोर दत्त आणि महाराष्ट्र क्रीडा धोरण समितीचे सदस्य अविनाश ओंबासे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
द. आफ्रिका क्रिकेट दौऱ्यासाठी महाराष्ट्राचा संघ रवाना, कल्याण-डोंबिवलीतील ७ खेळाडूंचा समावेश
