खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात टाकाऊ वस्तूंची वाहतूक करणाऱ्या एका डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण कठड्याला धडकून अपघात झाला. या अपघातात डंपर चालक जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०४ एफ पी ६२१० क्रमांकाचा डंपर टाकाऊ वस्तू घेऊन जात असताना भोस्ते घाटात चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे डंपर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण कठड्यावर आदळला. अपघातात डंपरचे मोठे नुकसान झाले असून, चालक जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच, मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी तात्काळ आपल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला आपल्या रुग्णवाहिकेतून भरणा नाका येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालकाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.