मकरंद सुर्वे/संगमेश्वर: संगमेश्वर-देवरुख मार्गावर संगमेश्वर बस स्थानकाजवळ असलेल्या तीन दुकानांचा नदीकाठचा भाग मुसळधार पावसामुळे कोसळून ३ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून मदत करण्याची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून होत आहे.
गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संगमेश्वर येथील सोनवी नदी दुथडी भरून वाहत आहे. याच पावसामुळे नदीकाठच्या जमिनीची धूप होऊन ती खचली, परिणामी आज सकाळी संगमेश्वर बस स्थानकाजवळील तीन दुकाने नदीच्या दिशेने कोसळली.
या दुर्घटनेत बाबासाहेब प्रभावळे यांच्या ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट्सच्या दुकानाचे सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, अजय निवळकर यांच्या टीव्ही रिपेरिंगचे दुकान आणि दिलीप हरी जोशी यांच्या फोटो स्टुडिओलाही जबर फटका बसला आहे.
या घटनेमुळे परिसरातील इतर दुकानांनाही धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांनी तातडीने प्रशासनाकडे पंचनामा करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन त्यांना योग्य ती मदत मिळू शकेल.