GRAMIN SEARCH BANNER

गणपतीपुळे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसचा विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर अपघात

Gramin Varta
10 Views

सांगली: एसटी बस व मालवाहू कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसचालकासह सहा महिला प्रवाशी जखमी होण्याची घटना मंगळवारी सकाळी योगेवाडी (ता. तासगाव) येथे घडली. अपघातग्रस्त महिला जाखापूर (ता.कवठेमहांकाळ) येथील असून, त्या गणपती पुळे येथे देवदर्शनासाठी निघाल्या होत्या. सर्व जखमींना तातडीने तासगाव ग्रामीण रुग्णालय आणि सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कवठेमहांकाळ आगाराची ही एसटी बस जाखापूर येथील भाविकांना घेऊन गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघाली होती. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर योगेवाडी येथे मालवाहू कंटेनरची व बसची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे बस आणि कंटेनर दोन्ही वाहनांचे गंभीर नुकसान झाले आहे.

या अपघातात बसचालक गोरख पाटील हे गंभीर जखमी झाले असून, जाखापूर येथील सहा महिला व एक मुलगी असे सात प्रवासीही जखमी झाले. जखमी झालेल्या महिला- मालन दत्तात्रय पाटील (वय ७०), काजल विशाल पाटील (३०), रुक्मिणी भीमराव पवार (५५), कमल वसंत पवार (६०), सुलाबाई गणपतराव पाटील (६०), रंजना दिलीप पाटील (४५), शालन वसंत पाटील (५५) आणि लहान मुलगी आदिरा विशाल पाटील (७).

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. जखमींना तासगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर बसचालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. इतर जखमी महिलांवर तासगाव येथे उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Total Visitor Counter

2647850
Share This Article