नाचणे येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे भूमिपूजन संपन्न; वाडेकरवाडीसह तीन वाड्यांतील ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार

Gramin Varta
26 Views

रत्नागिरी: नाचणे येथील वाडेकरवाडी परिसरातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था होऊन पत्राशेड उडाले होते, तसेच प्रेत ठेवण्याच्या जागेचे बीम धोकादायक झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. पावसाळा आणि उन्हाळ्यात अंत्यसंस्कारावेळी होणारा त्रास लक्षात घेता, स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेत भारतीय जनता पार्टीने या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई ढेकणे आणि रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या विशेष प्रयत्नातून, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या स्वनिधीतून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. या कामाचे भूमिपूजन आज उत्साहात पार पडले.

या विकासकामामुळे नाचणे गावातील सुपलवाडी, बाणेवाडी आणि वाडेकरवाडी येथील नागरिकांना आता सुविधापूर्ण स्मशानभूमी उपलब्ध होणार आहे. भूमिपूजन प्रसंगी जागेचे मालक लंबोदर करमरकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे, ग्रामपंचायत सदस्या शिवानी रेमुळकर यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धोकादायक बीम बदलल्यामुळे आणि नवीन पत्राशेड झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचा त्रास कायमचा मिटणार आहे. या महत्त्वपूर्ण विकासकामाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी मा. रवींद्रजी चव्हाण, सौ. वर्षाताई ढेकणे आणि दादा ढेकणे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *