कोल्हापूर: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील शिवाजी पूल ते पडवळवाडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेले अतिक्रमण हटावची मोहीम मंगळवारपासून सुरू झाली. सकाळी अकरा वाजल्यापासून शिवाजी पूल ते आंबेवाडीदरम्यानच्या 10 मीटर क्षेत्रामध्ये असलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या, हॉटेल, दुकानदार व व्यावसायिकांचे नामफलक, पत्र्याच्या शेडचे बांधकाम काढले.
नॅशनल हायवे प्राधिकरणने पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविली. अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून घेतले, तर काही बेवारस केबिन्स व बोर्ड पथकाने काढून टाकले. दिवसभरात शिवाजी पूल ते आंबेवाडीदरम्यानचे अनेक अतिक्रमणांवर कारवाई केली. येथील रस्त्याकडील अतिक्रमण केलेले अनेक व्यावसायिक व्यवसाय गुंडाळून केबिन्स व बोर्ड काढून घेण्यात व्यस्त दिसत होते. अतिक्रमणामुळे या रस्त्यावरील वाढलेली रहदारी व ट्रॅफिक जामचा रोजचा अनुभव वाहनधारकांना येत आहे; परिणामी वाढलेले अपघात या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेले अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने संबंधित अतिक्रमणधारकांना यापूर्वीच नोटीस जारी केल्या होत्या. त्यामुळे या मोहिमेला फारसा विरोध झाला नाही.
राष्ट्रीय महामार्गाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे अॅथॉरिटीचे वैभव पाटील, प्रकाश कदम, श्रीधर रेड्डी यांच्यासह कर्मचार्यांनी प्रत्यक्ष अतिक्रमण हटावप्रसंगीची परिस्थिती हाताळली. यावेळी जेसीबीचा वापर करण्यात आला. दरम्यान, आज दिवसभरात येथील फेरीवाल्यांचे, तसेच व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले. अतिक्रमण हटाव मोहीम काही दिवस सुरूच राहणार असून, त्याद़ृष्टीने अतिक्रमणधारक सतर्क झाले आहेत. अन्य लोकांना अतिक्रमण हटवण्याच्या सूचना हायवे अॅथॉरिटीच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू
