GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: मुर येथे डुक्कराच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी

Gramin Search
13 Views

राजापूर : तालुक्यातील मुर येथील कनिष्ठ महाविद्यालयाजवळ रस्त्याने चालत जाणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला जंगली डुक्कराने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यश अनंत साळवी (वय १७, रा. मुर, ता. राजापूर) असे जखमी मुलाचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी (१८ जून २०२५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यश साळवी आणि त्याचा मित्र पार्थ पाष्टे हे दोघे सकाळी सरस्वती विद्यालय-पाचल येथे अकरावीच्या प्रवेशाची माहिती घेण्यासाठी मुर गावातून जात होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलमय भागातून ते जात असताना, अचानक एका जंगली डुक्कराने यश साळवीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यश जागेवरच कोसळला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे तात्काळ लक्षात आले.

अपघातानंतर त्याला तातडीने रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

जंगल भागातून शहरांकडे किंवा मानवी वस्तीकडे येणाऱ्या वन्यप्राण्यांमुळे होणारे अपघात वाढत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विशेषतः शाळकरी मुले आणि पादचाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. वन विभागाने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Total Visitor Counter

2649938
Share This Article