रत्नागिरी : पाली येथे बंद बंगल्याचे लोखंडी ग्रील काढून घरफोडी; टीव्हीसह तांब्याच्या वस्तू लंपास

Gramin Varta
100 Views

रत्नागिरी : शहरालगतच्या पाली-माईनवाडी परिसरात बंद बंगल्याचे लोखंडी ग्रील काढून खिडकीतून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सॅमसंग कंपनीचा ५५ इंची एलईडी टीव्हीसह तांब्याच्या विविध वस्तू असा एकूण सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री ७.३० वाजल्यापासून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. पाली-माईनवाडी येथे सुरेंद्र सखाराम सावंत यांचा बंगला असून तो बंद होता. घरातील सर्व दरवाजांना कुलपे लावलेली असताना अज्ञात चोरट्याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत समोरील खिडकीचे लोखंडी ग्रील काढले. त्यानंतर खिडकी उघडून त्या मार्गाने घरात प्रवेश करत चोरी केली.

चोरट्याने घरातून सुमारे १५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा ५५ इंची फ्लॅट टीव्ही, तांब्याच्या पट्ट्या, तांब्याचे कप व बादल्या, तांब्याची मूत्रपात्रे तसेच जुन्या टेपरेकॉर्डर आदी साहित्य चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शांताराम विश्राम मांडवकर (वय ६०, रा. पाली-माईनवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.१९ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १८५/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :
4786620
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *