GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरमध्ये दरड कोसळली: शास्त्री पुलाजवळ घरांना धोका

Gramin Search
28 Views

संगमेश्वर : मुसळधार पावसामुळे आणि राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या चौपदरीकरण कामाच्या निष्काळजीपणामुळे संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ (पारकरवाडा) भीषण दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अब्दुल कादिर इस्माईल दळवी आणि फैजान दळवी यांच्या घरांना मोठा धोका निर्माण झाला असून, त्यांच्या घरांमध्ये मोठ्या भेगा पडल्या आहेत.

प्रशासनाने तातडीने दखल घेत, बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले आहेत.कसबा येथील ग्रामीण महसूल अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी रस्त्यालगत करण्यात आलेल्या अवैज्ञानिक कटिंगमुळे या घरांखालील जमीन खचली आहे, ज्यामुळे परिसरात गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, साखरपा येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी संबंधित घरांना भूसंपादन कायद्यानुसार नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली आहे.

सद्यस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने बाधित कुटुंबांना तातडीने स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेचा सविस्तर अहवाल लवकरच वरिष्ठ कार्यालयाला आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला सादर केला जाणार आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांनी संबंधित विभागांनी चौपदरीकरणाचे काम अधिक काळजीपूर्वक आणि सुरक्षितपणे करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने दरडग्रस्त भागात पुढील धोके टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेमुळे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Total Visitor Counter

3369591
Share This Article