चिपळूण : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रविवारी चिपळूण शहरातील वाशिष्ठी व शिवनदीला पूर आला. नद्यांचे पाणी पात्राबाहेर जाऊन बाजारपेठांसह नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील बाजारपूल, वडनाका, भोगाटे परिसरात पाणी शिरल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपयांचा माल पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘अलर्ट मोड’ जाहीर करत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, खेड तालुक्यातही दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने जोर धरला. डोंगरकड्या-ओढ्यांना पूर येऊन गावोगावी भीतीचे सावट पसरले आहे. संगमेश्वर व माखजन बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे
चिपळूणात वाशिष्ठी, शिवनदीला पूर : व्यापारी व नागरिक धास्तावले
