चिपळूण: आषाढी एकादशीनिमित्त चिपळूण व खेड तालुक्यातील सुमारे दीड हजार वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. यात बाल वारकऱ्यांसह महिलांचाही लक्षणीय सहभाग आहे. कोकण दिंडी समाजाची पंढरपूर पायी वारीची १०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. परशुराम येथील राजेश शिर्के घराण्याची कोकण दिंडी १७६ वर्षांपासून सुरु आहे. याशिवाय, हजारो वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत.
चिपळूण आगाराकडून वारकऱ्यांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक वारकरी टेंपो व खासगी वाहनांतून दिंडीत सहभागी झाले आहेत. कोकण दिंडीचा शेवटचा मुक्काम पोफळीतील मानकरवाडीत असतो. घाटमाथ्यावर पोहोचल्यावर आवश्यक साहित्य ट्रकमधून नेले जाते आणि ठराविक मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी खाण्या-पिण्याची तयारी करतात.
शनिवारी सर्व संतांच्या पालख्या वाखरी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी अनेकजण गुरुवार, शुक्रवारपासूनच पंढरपूरला रवाना झाले आहेत. पंढरपूरमधील भक्तनिवास आणि धर्मशाळेत वारकरी मुक्काम करणार आहेत. चिपळूण, गुहागर आणि खेड तालुक्यातील भक्तांसाठी ३५ नंबरची जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. हे सर्व भाविक सोमवारी (ता. ७) परतीचा प्रवास सुरू करतील.
वारकऱ्यांच्या दिनक्रमाविषयी माहिती देताना लोटे येथील कीर्तनकार शैलेश आंब्रे यांनी सांगितले की, वारकऱ्यांच्या जेवणाची वेळ निश्चित असते. सकाळी काकड आरती आणि न्याहारीनंतर ते चालण्यास सुरुवात करतात. दुपारी वाटेत विसावा घेऊन किंवा मुक्कामाच्या ठिकाणी भोजन करतात. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर जेवणाची सोय असते. अन्न-औषध प्रशासन वारीतील अन्न आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी कार्यरत असते, ज्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.