GRAMIN SEARCH BANNER

सांची सावंत नसत्या तर नाटे पोलिस ठाणे जळून खाक झाले असते…

Gramin Varta
18 Views

प्रसुती दरम्यानच्या मृत्यूनंतर नाटे पोलिसांनी जागवल्या आठवणी, सारेच गहिवरले

राजन लाड : राजापूर

कर्तव्य बजावत असताना संकटांच्या सावटाखालीही शौर्य गाजवणाऱ्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सांची सुदेश सावंत यांच्या निधनाने संपूर्ण जिल्हा पोलीस दल शोकमग्न आहे. त्यांच्या सेवा काळातील एक हृदयद्रावक पण प्रेरणादायी प्रसंग आज पुन्हा उजळून निघतो आहे – नाटे पोलीस ठाण्याचा जळत्या आगीतून त्यांनी शस्त्रसाठा वाचवला…

कोकणात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात उसळलेल्या आंदोलनादरम्यान, राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्यावर आंदोलकांनी हल्ला करत ठाणे पेटवून दिले होते. त्या भयावह क्षणी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या एकमेव महिला पोलीस अधिकारी म्हणजेच सांची सावंत मॅडम. संपूर्ण ठिकाणी अराजकता, धावपळ आणि भीतीचं वातावरण असताना त्यांनी प्रसंगावधान राखत सर्वप्रथम शस्त्रसाठा – विशेषतः रायफल्स – सुरक्षित स्थळी हलवला.

त्या काही क्षणात जर सावंत मॅडमनी हा निर्णय घेतला नसता, तर शस्त्रसाठा आंदोलकांच्या ताब्यात जाऊन मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. त्या क्षणी दाखवलेले त्यांचे धैर्य, शांतचित्त निर्णयक्षमता आणि कर्तव्य निष्ठा ही आज त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि संपूर्ण जिल्हा पोलीस दलाच्या मनात कोरली गेली आहे.

या घटनेची आठवण काढताना त्यांच्या सहकाऱ्यांचे डोळे पाणावले. “त्या प्रसंगाने सावंत मॅडम आमच्यासाठी केवळ सहकारी नव्हे, तर आदर्श ठरल्या…” अशा शब्दांत त्यांच्या एका सहकाऱ्याने भावना व्यक्त केल्या.

कर्तव्यावर अखेरच्या क्षणापर्यंत आपलं शौर्य सिद्ध करणाऱ्या सांची सुदेश सावंत यांचा मृत्यू ही संपूर्ण पोलीस दलासाठी आणि समाजासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या आठवणी आणि कर्तृत्व सदैव प्रेरणा देत राहतील.

Total Visitor Counter

2648367
Share This Article