जेएसडब्ल्यू एनर्जीची सकारात्मक भूमिका : माजी सरपंचासह स्थानिकांची यशस्वी मध्यस्ती
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू एनर्जी प्रकल्प यांच्याविरोधात स्थानिक शेतकरी किशोर परशुराम सुर्वे यांनी ७ ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. आज (१२ ऑक्टोबर) या उपोषणाचा सहावा दिवस होता. श्री. सुर्वे यांच्या मागण्यांबद्दल एनर्जीचे अधिकारी नरेश विलणकर यांच्यासमवेत जयगडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद प्रभाकर घाटगे, अनिरुद्ध कमलाकर साळवी आदी मंडळी सकारात्मक चर्चा करत होते. आज सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जेएसडब्ल्यू एनर्जीच्या प्रशासनाबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर यशस्वी बोलणी होऊन श्री. सुर्वे यांचे उपोषण पूर्णपणे संपल्याचे जाहीर करण्यात आले.
या विषयात जयगड पोलीस ठाण्याचे अधिकारी संजय पाटील साहेब यांनीही पुढाकार घेतला होता. आज या उपोषणामुळे या भागातील सामाजिक वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. एका स्थानिक गरीब शेतकऱ्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी अनेक लोकांचे लक्ष लागून राहिले होते. श्री. सुर्वे यांच्या मागण्या जेएसडब्ल्यू प्रशासन यांनी मान्य केल्या. इतर प्रलंबित बाबतीत जेएसडब्ल्यू प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊ स्थानिक शेतकऱ्याला मदत होईल अशाप्रकारेच आमची भूमिका असेल असे जाहीर केले. यामुळे आज सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास जयगडचे माजी सरपंच अनिरुद्ध साळवी यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन श्री. सुर्वे यांनी आपले उपोषण संपवले.
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. घाटगे, शिवसेना शाखाप्रमुख नारायणशेठ काताळकर, सडेवाडी येथील विकास निंबाळकर, समीर मयेकर, प्रशांत किशोर सुर्वे, सौ. कामिनी किशोर सुर्वे, शैलेश मयेकर, सुदेश खाडे, जयगडचे पोलीस पाटील प्रसाद गुरवआदी मान्यवर उपस्थित होते.
या उपोषणाच्या आडून काही बाह्यशक्ती उपोषणाचा शेवट कडू व्हावा, तणाव वाढावा, जेएसडब्ल्यू कंपनीविरोधात जनमत व्हावे, या पद्धतीने सुद्धा कार्यरत होत्या; परंतु उपोषणकर्ते श्री. सुर्वे यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन तडजोडीच्या मार्गाने स्थानिक नेतृत्व, ग्रामस्थ बंधू-भगिनी, यांच्या मार्गदर्शने उपोषणाची गोड सांगता केली याबद्दल सर्व संबंधितांनी आनंद व्यक्त केला आहे. पुढील कायदेशीर बाबी कंपनी प्रशासन आणि शेतकरी कुटुंबीय यांच्याकडून उद्यापासूनच एकमेकांच्या सहकार्याने सुरू करीत आहेत.