देवरुख – येथील केशवसृष्टी भागातील एका बंद घरात घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना देवरुख पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. ही घटना गुरुवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, केशवसृष्टी येथे राहणारे शामराव रामचंद्र सप्रे यांचे घर बंद असताना, चोरट्यांनी घराची किल्ली काढून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटण्याचा प्रयत्न करत असतानाच, पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी कपाट उघडण्यासाठी कटावणी, कडळ आणि स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला होता.
याप्रकरणी संजय प्रभाकर इंदुलकर (वय ४१, रा. देवरुख केशवसृष्टी) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रविराज वसंत बिर्जे (वय ३२, रा. कोसंबी रामवाडी, ता. संगमेश्वर) आणि मंगेश काशीनाथ पेंढारी (वय ४२, रा. देवरुख कांगणेवाडी, ता. संगमेश्वर) या दोन आरोपींना अटक केली आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देवरुखात घरफोडी करताना दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले
