गोव्यातून पिस्तूल आणल्याची कबुली
मुंबई : मालवणी येथे शांततेला छेद देणारा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. पिस्तूल खोचून खुलेआम दहशत माजवत फिरणाऱ्या खेड (जि. रत्नागिरी) येथील आरिफ शहा या गुंडाला मालवणी पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून भारतीय बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. त्याने हे शस्त्र थेट गोव्यातून आणल्याची खळबळजनक कबुली दिली आहे.
शुक्रवारी रात्री मालवणी परिसरात गस्त घालत असताना पोलिस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांच्या पथकाला म. वा. देसाई मैदानाजवळील फुटपाथवर एक व्यक्ती पॅन्टच्या मागे पिस्तूल खोचून संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत शहाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून शस्त्रसाठा जप्त केला.
शहाच्या अंगझडतीत एक भारतीय बनावटीचं सिल्वर आणि काळ्या रंगाचं पिस्तूल सापडलं. त्यासोबत चार जिवंत काडतुसेही मिळाली. या शस्त्रसाठ्याची किंमत सुमारे ७९ हजार रुपये असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. पोलिस उपायुक्त संदीप जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर आणि निरीक्षक जीवन भातुकले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
अधिक चौकशीत शहा ने हे पिस्तूल गोव्यातून आणल्याची कबुली दिली आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याच्या या गुन्ह्यात इतर कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांचे पथक युद्धपातळीवर करत आहे.
मुंबईत खुलेआम दहशत माजवणाऱ्या खेडच्या गुंडाला पिस्तूलासह अटक
