राजन लाड ( जैतापूर)
रत्नागिरी बस डेपोमधून नाटे गावाकडे जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धक्कादायक अनुभव आला. प्रवासादरम्यान बस चालकाने वारंवार मोबाईल फोनवर बोलत गाडी चालवल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, अपघात-प्रवण रस्ते जसे की घाटातील तीव्र उतार आणि अडीवरे येथील मोठ्या करविंग भागामध्येही चालकाने एका हातात फोन धरून दुसऱ्या हाताने बस चालवली. त्या वेळी गाडीत लहान मुले, वयोवृद्ध महिला तसेच अनेक प्रवासी उपस्थित होते. प्रवाशांचा जीव अक्षरशः धोक्यात घालणारी ही कृती अत्यंत धोकादायक ठरू शकली असती.
एका प्रवाशाने सांगितले की – “मी स्वतः बसमध्ये असताना हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला असून, त्याचा व्हिडिओ पुराव्यासाठी माझ्याकडे उपलब्ध आहे. संबंधित चालकाविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा कधीही मोठा अपघात होऊ शकतो.”
प्रवाशाने जिल्हा परिवहन विभागाकडे औपचारिक तक्रार दाखल केली असून, त्यासोबत शूट केलेल्या व्हिडिओंची लिंक आणि बसचे तिकीट पीडीएफ स्वरूपात जोडले आहे. कारण परिवहन महामंडळाच्या वेबसाईटवर 1 एमबी पेक्षा मोठी फाईल अपलोड करता येत नाही.
याबाबत प्रवाशांनी स्पष्ट मागणी केली आहे की – संबंधित चालकाविरुद्ध चौकशी करून त्यांना कठोर सूचना द्याव्यात, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची बेपर्वाई पुन्हा होणार नाही. अन्यथा प्रवाशांचा जीव धोक्यात राहील आणि एखादा मोठा अपघात घडल्यास त्याला परिवहन प्रशासन जबाबदार असेल.
राजापूर : नाटे मार्गावर एस.टी. बस चालक फोनवर; प्रवाशांचा जीव धोक्यात
