GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत वाहतूक नियमांवर ‘हायटेक’ नजर; अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनाचे पोलीस अधीक्षकांकडून लोकार्पण

Gramin Varta
373 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि नियमांचे पालन करणारी बनवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात एका अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. आज, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलीस मुख्यालय येथे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

वाहतूक सुरक्षेस बळकटी देणे, महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि निरपराध लोकांचे प्राण वाचवणे हा या नवीन वाहनाचा मुख्य उद्देश आहे. हे इंटरसेप्टर वाहन संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यरत राहणार असून विशेषतः राज्य महामार्गांवरील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याकडे विशेष लक्ष देणार आहे.
या अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंचलित पद्धतीने दंडात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या वेगमर्यादा ओलांडणारे वाहनचालक, चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट न वापरणारे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणारे तसेच चारचाकी व जड वाहनांकडून होणारे अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर ‘हायटेक’ पद्धतीने नियंत्रण ठेवले जाईल. या वाहनाद्वारे होणारी दंडात्मक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, तांत्रिक आणि स्वयंचलित असणार आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता वाढेल आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.

या महत्त्वपूर्ण लोकार्पण सोहळ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, श्री. निलेश माईनकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्या) श्रीमती. राधिका फडके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन भोयर, मोटार परिवहन विभाग अधिकारी, तसेच वाहतूक शाखेतील अंमलदार उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पोलिसांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व महामार्गांवर बेफिकीरपणे वाहन चालवणाऱ्या आणि वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या सर्व वाहनचालकांसाठी हा एक स्पष्ट इशारा आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, निर्धारित वेगमर्यादेत वाहन चालवावे आणि अपघात व कायदेशीर कारवाई टाळावी.

Total Visitor Counter

3366861
Share This Article