जयसिंगपूर : नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाची ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हत्तीण न्यायालयाच्या आदेशाने ‘वनतारा’मध्ये नेण्यात आले आहे.
यावरून नागरिकांतून संतप्त भावना असल्याने रविवारी विराट पदयात्रा काढण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी 10.30 वाजता मुंबई येथील मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्री, आजी-माजी खासदार व आजी-माजी आमदार यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
नांदणी येथील मठातून महादेवी हत्तीणीला 28 जुलैला वनताराच्या पथकाने नेले होते. याच दिवशी संतप्त जमावाने आक्रोश करून झालेल्या दगडफेकीत पोलिसांच्या 7 वाहनांचे नुकसान आणि 12 पोलिस जखमी झाले होते. याप्रकरणी 164 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे महादेवी हत्तीणला वनतारा केंद्रात नेल्याने महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून तीव्र संताप व्यक्त होऊन गावागावातून मूक मोर्चा, ग्रामपंचायत ठराव, गाव बंद, कँडल मार्चसह शेकडो मोर्चे काढण्यात येत आहेत.
रविवारी राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदणी ते कोल्हापूर 45 किलोमीटरची मूक विराट पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले. या मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती येथे असताना मंगळवारी महादेवी हत्तीणप्रकरणी बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीसाठी नांदणी मठाधीश स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, दिल्ली तिसारा मठाचे स्वस्तिश्री सौरभसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यासह उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, खा. विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आ. विनय कोरे, आमदार सतेज पाटील, आ. अमल महाडिक, आ. विश्वजित कदम, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आ. राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह सागर शंभुशेटे, भालचंद्र पाटील, आप्पासो भगाटे, डॉ. सागर पाटील, अॅड. मनोज पाटील यांच्यासह वन विभागाचे सचिव, वन्य जीवचे प्रधान मुख्य वन संरक्षक, जिल्हा पोलिस प्रमुख, वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटकचे लक्ष
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी-कोल्हापूर-बेळगाव-तेरदाळ हा मठ आहे. या मठांतर्गत महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील 865 गावांचे अधिपत्य आहे. पेटाने तक्रार दाखल केल्यानंतर या मठाच्या माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशानुसार वनतारा केंद्रात हलविण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रसह कर्नाटकातून याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत बैठक होत आहे. याकडे राज्यासह कर्नाटकचेही लक्ष लागून राहिले आहे.
‘महादेवी हत्तीण’प्रकरणी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
