रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याने क्षयरोग (टीबी) नियंत्रणात मोठी प्रगती साधली आहे. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे आणि जनजागृती मोहिमांमुळे गेल्या दहा वर्षांत क्षयरुग्णांच्या संख्येत तब्बल ३९ टक्के घट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारताला टीबीमुक्त करण्याचा जो संकल्प केला आहे, त्या दिशेने रत्नागिरी जिल्ह्याची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे.
मागील वर्षी २०२४ मध्ये जानेवारी ते मे या कालावधीत जिल्ह्यात ९२२ क्षयरुग्ण आढळले होते, तर यावर्षी (२०२५) याच कालावधीत ही संख्या ७७७ पर्यंत खाली आली आहे. २०१५ नंतर क्षयरुग्णांची संख्या वाढत असताना, आरोग्य विभागाने राबवलेल्या विशेष जनजागृती मोहिमेमुळे आणि रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळाल्याने ही लक्षणीय घट दिसून आली आहे.
जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायती, शहरे आणि विविध तालुक्यांमध्ये सक्रियपणे काम केले जात आहे. मागील वर्षी जिल्ह्याला २,४०० रुग्णांचे निदान करण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी वर्षभरात २,१३६ रुग्णांचे निदान झाले, जे ८९ टक्के उद्दिष्ट पूर्ण दर्शवते.
जुलै महिन्यापासून जिल्ह्यात सक्रिय क्षयरोग शोधमोहीम (Active TB Case Finding Campaign) राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत ६० वर्षांवरील व्यक्ती, ज्यांना पूर्वी टीबी झाला आहे किंवा ज्यांना पुन्हा टीबी होण्याची शक्यता आहे, तसेच विविध आजार असलेल्या आणि टीबीची लक्षणे असलेल्या संशयित व्यक्तींची तपासणी केली जाईल. अशा संशयितांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयात पाठवले जाईल. या मोहिमेसाठी विशेष पथके आणि आशा वर्करची नेमणूक करण्यात आली आहे.
क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी दरमहा १ हजार रुपये दिले जातात. काही रुग्णांना यामुळे चांगला आहार मिळतो, परंतु उर्वरित रुग्णांनाही पुरेसा पोषण आहार मिळावा यासाठी क्षयरोग विभागाने जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटनांना पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे.
क्षयरोग बाधितांची रुग्णालयनिहाय आकडेवारी (जानेवारी ते मे २०२५)
