GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतही उमटली पुणेरी पाटीची झलक, बेशिस्त वागणाऱ्या वाहनचालकांना शब्दांचा मार

रत्नागिरी : पुणेरी पाट्यांची चर्चा सर्वत्र होत असते. मात्र, अशीच एक पाटी रत्नागिरी शहरातही पाहायला मिळत असून, या पाटीची सध्या चर्चा रंगू लागली आहे. ही पाटी म्हणजे ‘काेणीही यावे आणि गाडी लावून जावे’ असे वागणाऱ्या वाहनचालकांसाठी शब्दांचा मार ठरत आहे.

अलीकडे काेणीही काेठेही वाहन उभे करून निघून जातात. उभी केलेली गाडी काेणाच्या घरासमाेर आहे, काेणाच्या दुकानासमाेर आहे की, काेणाच्या वाटेत आहे, हे न पाहताच बिनधास्त गाडी उभी केली जाते. मात्र, यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागताे याचे भान वाहनचालकांना राहत नाही. वारंवार गाडी उभी करून नाहक मनस्ताप सहन करावा लागणाऱ्या काही मंडळींनी आता थेट ‘पुणेरी पाटी’चाच वापर केला आहे.

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे नाचणे मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ ही पाटी लावण्यात आली आहे. या पाटीवर ठळक अक्षरात ‘माणसांसाठी नो पार्किंग, गाढवांसाठी राखीव’ असे लिहिलेले आहे. या पाटीमुळे त्या परिसरात गाडी उभी करणाऱ्यांना आता न बोलता शब्दांचा मार देण्यात आला आहे. पुणेरी पाटीची रत्नागिरीतही झलक पाहायला मिळत असल्याने या पाटीची सध्या शहरात चर्चा रंगू लागली आहे.

Total Visitor Counter

2455425
Share This Article