3 तासांहून अधिक काळ आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
चिपळूण : गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील तब्बल ११ हजार गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ‘TWJ’ कंपनीच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांचे सुमारे २ हजार कोटी रुपये थकवून बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनीने चिपळूण येथील कार्यालयाचे भाडे थकवल्यामुळे अखेर संबंधित सोसायटीने कायदेशीर मार्गाने कार्यालयाचा ताबा घेतला आहे. या घटनेमुळे हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कंपनीची आर्थिक अनियमितता आणि फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने, कार्यालयातील मालमत्ता आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी तातडीने आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गेले तीन तासांहून अधिक काळ कार्यालयाची कसून चौकशी आणि तपासणी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
‘TWJ’ कंपनीचे प्रमुख समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी सी. नेहा नार्वेकर यांनी कंपनीचे प्रतिनिधी म्हणून संकेश घाग आणि सिद्धेश कदम यांच्यामार्फत गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. गुंतवणुकीवर दर महिन्याला ३ ते ४ टक्के असा भरघोस परतावा देण्याचे मोठे आमिष त्यांनी दाखवले होते. या मोहक योजनेला बळी पडून अनेकांनी आपली कष्टाची आणि आयुष्यभराची जमापुंजी या कंपनीत गुंतवली. मात्र, आश्वासित केलेला परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या कंपनीवर यापूर्वीच यवतमाळ आणि चिपळूण येथील पोलीस स्थानकांत फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी जिल्ह्यातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. ‘TWJ’ कंपनीकडून रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीची फसवणूक झाली असल्यास, त्यांनी त्वरित जवळच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल करावी, असे आवाहन रत्नागिरी पोलीस प्रशासनाने केले आहे. यामुळे गुन्ह्याच्या तपासाला अधिक गती मिळणार असून, फसवणुकीच्या या मोठ्या प्रकरणाची व्याप्ती पूर्णपणे स्पष्ट होण्यास मदत होईल. कंपनीच्या कार्यालयातील च्या तपासणीतून कोणती माहिती पुढे येते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अधिक माहितीसाठी आणि तपासाच्या पुढील घडामोडींसाठी वाचत रहा.