देवरुख: देवरुख शहराच्या विकासाचा संकल्प घेऊन तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ‘गाव विकास समिती’ने (गा.वि.स) एक अभिनव उपक्रम जाहीर केला आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, समितीने ‘झिरो बजेट इलेक्शन’ची घोषणा केली असून, सामाजिक कार्यकर्ते आणि नव्या विचारांच्या तरुण-तरुणींना राजकारणात सक्रिय होण्याची संधी देण्याचा निर्धार गाव विकास समितीने व्यक्त केला आहे.
गाव विकास समितीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, जे सामाजिक कार्यकर्ते किंवा तरुण-तरुणी देवरुख शहराच्या विकासासाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत,ज्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे परंतु राजकीय पाठबळ नाही अशांना गाव विकास समिती एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. “तुम्ही निवडणूक लढवणार असाल, तर गाव विकास समिती संधी देईल,” असे थेट आवाहन समितीने केले आहे.
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मांडलेली ‘झिरो बजेट इलेक्शन’ ही संकल्पना. निवडणुकीतील पैशाचा अनावश्यक वापर टाळून, केवळ विकासाच्या मुद्द्यांवर आणि लोकांच्या थेट संपर्कातून निवडणूक लढवण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे राजकारणात स्वच्छ आणि प्रामाणिक नेतृत्वाला संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमासाठी सौ. अनघा कांगणे आणि दिशा खंडागळे-गीते यांनी पुढाकार घेतला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन शहराच्या विकासासाठी काम करण्याचा समितीचा मानस असल्याचे यातून स्पष्ट होते.
गाव विकास समितीच्या या पुढाकारामुळे देवरुखच्या स्थानिक राजकारणात एक सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ‘झिरो बजेट’ प्रयोगामुळे अनेक नवीन आणि होतकरू चेहरे राजकारणात येऊन विकासाला नवी दिशा देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.