रत्नागिरी (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ला शाखेत तब्बल ५० लाख रुपयांच्या सोन्याचा अपहार झाल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी एका संशयिताला अटक करण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमोल आत्माराम मोहिते (वय ४२, रा. टिके, रत्नागिरी) असे असून, तो बँकेत शिपाई म्हणून कार्यरत होता. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य दोन संशयित आरोपी मात्र पोलिसांच्या अटकेच्या भीतीने पसार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
बँकेकडे तारण ठेवलेले सुमारे ५० तोळे सोने लंपास केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बँकेचा शिपाई अमोल मोहिते, शाखाधिकारी किरण विठ्ठल बारये, आणि कॅशियर ओंकार अरविंद कोळवणकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यातील मुख्य संशयित आरोपी अमोल मोहिते याला पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली.
मात्र, पोलिसांना अटक करणार असल्याचा सुगावा लागताच शाखाधिकारी किरण बारये आणि कॅशियर ओंकार कोळवणकर हे दोघेही पसार झाले आहेत.
हा अपहाराचा प्रकार १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला असल्याचे समोर आले आहे. बँकेत ग्राहकांकडून सोन्याचे दागिने तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज दिले जाते. याच सोन्याच्या तिजोरीतील ५० तोळे सोने लंपास झाल्याचे उघडकीस आले. सुरुवातीला बँकेने अंतर्गत चौकशी केली. त्यानंतर बँकेचे अधिकारी सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर (वय ५४, रा. माळनाका, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी प्राथमिक तपास करत तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२),(४),(५) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
संशयित आरोपींनी संगनमत करून सुमारे ५० तोळे सोने लंपास केले असून, त्याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत ५० लाख रुपये आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून लंपास केलेले सोने कुठे ठेवले किंवा त्याचे काय केले, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत काही दागिने पोलिसांच्या हाती लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अन्य दोन आरोपींना अटक झाल्यानंतरच उर्वरित सोन्याच्या दागिन्यांची माहिती मिळू शकेल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.