राजापूर / तुषार पाचलकर: तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात मराठी भाषा व वाङ्मय मंडळामार्फत ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या शोकसभेत साहित्यातील त्यांचे योगदान आणि जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात करताना मराठी भाषा व वाङ्मय मंडळ प्रमुख डॉ. बी. टी. दाभाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’ या संग्रहामुळे त्यांना ‘डोह’कार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी झाली असून ते एक व्रतस्थ व संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. ‘डोह’, ‘मनातल्या उन्हात’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ यांसारख्या प्रसिद्ध साहित्यकृतींमधून त्यांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध केले आहे. अशा या महान लेखकाच्या साहित्यकृतींचा तरुणांनी अभ्यास करून त्यांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या श्रद्धांजली सभेत दिवंगत लेखक श्रीनिवास कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






