GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा उत्साहात

Gramin Varta
4 Views

रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय शामराव पेजे सांस्कृतिक भवनात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा उत्साहात पार पडली. अभियानाच्या उद्घाटन समारंभात बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. ग्रामसभा या विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत.

स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. गावचा सरपंच गावचा मुख्यमंत्री असतो. सरपंचाची ताकद त्यांनी विधायकदृष्ट्या वापरली, संपूर्ण गावाला घेऊन काम केले, तर सगळीच्या सगळी बक्षिसे आपण मिळवू शकतो. आपल्या जिल्ह्याचा सर्वांकडून विकास झाला पाहिजे. आपल्या जिल्ह्याकडे आदर्श म्हणून महाराष्ट्राने बघितले पाहिजे, त्यासाठी एकदिलाने काम करावे. पालकमंत्री म्हणाले, अजून काही गावे महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर आणायची असतील, तर स्वच्छता असणे गरजेचे आहे. तेथे 50 – 50 घरांमध्ये न्याहरी निवास योजनेचे काम सुरू करण्याची जबाबदारी माझी आहे. आपला परिसर स्वच्छ असला पाहिजे. हे अभियान शंभर दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने दाखवायचे असेल, तर या सरपंचांबरोबर, ग्रामसेवकांबरोबर अधिकारीदेखील असणे गरजेचे आहे. आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी कंपनी येत असेल, तर त्याच्या विरोधामध्ये ग्रामसभा होते. हे जगामध्ये फक्त आपल्याकडे घडते. ग्रामपंचायतीमध्ये होणारा कचरा चांगल्या पद्धतीने जमा केला पाहिजे. त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. स्वच्छ वातावरणामध्ये निर्मळ वातावरणामध्ये आपला गाव ठेवला पाहिजे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. समाजाविषयी आपल्याला काहीतरी काम करायचे आहे, या भावनेतून सरपंचांनी, ग्रामपंचायत सदस्यांनीदेखील या अभियानात काम करावे. संधी चालून आली आहे. हे 100 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. कोण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणार आहे, कोण जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणार आहे, ते सगळे लोक लक्षात ठेवतात आणि अशा अभियानाच्या माध्यमातून सरपंच घराघरापर्यंत पोहोचले, ग्रामपंचायत सदस्य घराघरात पोहोचले तर राजकीय अस्तित्व राहणार आहे. हा कार्यक्रम आपण घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे. सगळ्या परंपरा आणि संस्कार असणारा रत्नागिरी जिल्हा परीक्षेमध्ये पुढे असतो. जिल्हा परिषदेच्या शाळेतील पट कमी का होत आहे, याचादेखील विचार शंभर दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी करायला हवा. दामले विद्यालय पहिलीमध्ये 160 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकते तर ग्रामीण भागातील शाळा 60 विद्यार्थ्यांना का देऊ शकत नाही, याचे आत्मचिंतन केले पाहिजे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी प्रास्ताविकामध्ये अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांनी आभार मानले. कार्यशाळेस सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

2650639
Share This Article