रत्नागिरी : तालुक्यातील बोंड्ये कुणबीवाडी येथील एका महिलेचे भरदिवसा चोरट्यांनी घर फोडून 3 लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभांगी शिवाजी भोसले (वय ५७, व्यवसाय गृहिणी, रा. बोंड्ये कुणबीवाडी, ता. जि. रत्नागिरी) या काल दुपारी १२.३० ते ३.३० च्या सुमारास त्यांच्या वाडीतील डॉ. वाणी यांच्याकडे उपचारासाठी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने थेट बेडरूम गाठले. तेथे असलेल्या लोखंडी कपाटाचे ड्रॉवर कपाटाला अडकवलेल्या चावीने उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शुभांगी भोसले घरी परतल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली. चोरीस गेलेल्या मालामध्ये ७ तोळे वजनाचे, सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि अर्धा तोळा वजनाची, सुमारे २० हजार रुपये किमतीची सोन्याची कानातील कडी यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे ३ लाख रुपये आहे.
या प्रकरणी शुभांगी भोसले यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, असण्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी अज्ञात असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे बोंड्ये कुणबीवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ही चोरी माहितगार व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त होत आहे.